धूमकेतूवर प्रथमच उतरवला यंत्रमानव!

•नोव्हेंबर 13, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

फ्रॅंकफर्ट – युरोपियन स्पेस एजन्सीच्या “रोसेटा‘ या अंतराळयानाने “67 पी‘ (च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्को) या धूमकेतूवर “फिली‘ या नावाचा यंत्रमानव यशस्वीरीत्या उतरवला आहे. धूमकेतूवर यंत्रमानव उतरविण्याची अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या यंत्रमानवाकडून पहिला रेडिओ संदेश मिळाला आहे. या यंत्रमानवाकडून लवकरच छायाचित्रे प्राप्त होण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Rosetta_orbiting_Comet_67P_Churyumov-Gerasimenko

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास “रोसेटा‘ या अंतराळयानातून “फिली‘ला धूमकेतूच्या दिशेने सोडले. “”हा यंत्रमानव “फ्री-फॉल‘ करीत धूमकेतूच्या दिशेने गेला. यंत्रमानव उतरलेल्या ठिकाणाला “अगिल्किया‘ हे नाव देण्यात आले आहे. ही प्रक्रिया खूपच किचकट व विमानामधून एखादे वॉशिंग मशीन खाली फेकण्यासारखी होती. एवढ्या मोठ्या उंचीवरून यंत्रमानवाचे तुकडे होण्याची भीती होती व त्याचबरोबर नियोजित जागी त्याला उतरविणे हेही मोठे आव्हान होते. मात्र, या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाल्या आहेत. ही प्रक्रिया पृथ्वीपासून 50 कोटी 90 लाख किलोमीटर उंचीवर घडली,‘‘ असेही संशोधकांनी स्पष्ट केले.

हा यंत्रमानव धूमकेतूवरील खोल खड्डे आणि बर्फाचे डोंगर अशा विचित्र पृष्ठभागाचा अभ्यास करणार असून, सौरमालेच्या जन्मामध्ये धूमकेतूंचा कसा सहभाग होता, हे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

हा धूमकेतू सूर्याभोवती एक फेरी मारण्यास 6.45 वर्षे घेतो व त्याची कक्षा सूर्यापासून कमीत कमी 18 कोटी किलोमीटर, तर अधिकाधिक 84 कोटी किलोमीटर आहे.

“मॉम‘नेही “टिपला‘ धूमकेतू
भारताच्या मंगळयानाने “67 पी‘ या धूमकेतूचे एक महिन्यापूर्वी टिपलेले छायाचित्र “इस्रो‘ने बुधवारी प्रसिद्ध केले. या धूमकेतूचे दर्शन मंगळयानाला 19 ऑक्‍टोबरला झाले होते. त्या वेळी “मॉम‘ने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते, “”बापरे, लक्षात राहण्यासारखा अनुभव. धूमकेतूला अगदी जवळून वेगाने जाताना पाहिले. मी माझ्या कक्षेतच आहे, सुरक्षित आणि सुस्थितीत!‘‘ मंगळयानाच्या कॅमेराने धूमकेतूच्या “कोमा‘ या पृष्ठभागावरील प्रकाशमान भागाचे छायाचित्र काढले आहे.
Rosetta_and_its_target_comet
रोसेटा अंतराळयानाबद्दल…
अंतराळात झेप : 2 मार्च 2004
धूमकेतूच्या कक्षेत प्रवेश : 6 ऑगस्ट 2014
उपकरणे : तीन स्पेक्‍ट्रोस्कोप, एक मायक्रोस्कोप रेडिओ अँटेना आणि एक रडार

“रोसेटा‘च्या मोहिमेची वैशिष्ट्ये
- धूमकेतूच्या मार्गावर यानाने उपग्रहांच्या पट्ट्यामधून मार्गक्रमण केले असून, असा प्रवास करणारे ते पहिले युरोपियन यान.
– सौरऊर्जेचा वापर करीत गुरूच्या कक्षेजवळून गेलेले “रोसेटा‘ हे पहिलेच अंतराळयान.
– धूमकेतूच्या बरोबर त्याच्याच वेगाने प्रवास करणारे हे पहिलेच अंतराळयान असून, धूमकेतूवर सूर्याच्या उष्णतेमुळे काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारे हे पहिले यान ठरणार.
– धूमकेतूवर प्रथमच एखादी वस्तू (यंत्रमानव) उतरविण्यात आला असून, त्याच्या पृष्ठभागावरून प्रथमच छायाचित्रे मिळतील.
– धूमकेतूवरील खनिजांचा त्यावर उतरून केलेला हा पहिलाच अभ्यास ठरेल.
माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम
छायाचित्रे सौजन्य : जालावरुन साभार

मंगळ मोहीम- लिक्विड इंजिनचे यशस्वी प्रक्षेपण

•सप्टेंबर 22, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

मंगळयान ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण प्रभावकक्षेत दाखल

बंगळूर / चेन्नई- विक्षेपी गतिमार्गातील चौथा टप्पा पार करून मंगळाच्या दिेशेने आघाडी घेताना मंगळयानावरून मेन लिक्विड इंजिनचे प्रक्षेपण आज (सोमवारी) दुपारी अडीच वाजता यशस्वीपणे करण्यात आले.

ऐतिहासिक मंगळ मोहिमेसाठी (मार्स ऑर्बिटर मिशन- मॉम) उड्डाण केलेले भारताचे मंगळयान सोमवारी मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असलेल्या कक्षेत पोचले आहे. हे यान २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रत्यक्ष प्रवेश करणार आहे.

‘आमचे दिशादर्शक यंत्र (नेव्हिगेटर) दाखवत आहे की ‘मॉम‘ने मंगळाच्या प्रभावगोलामध्ये प्रवेश केला आहे,‘ असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
मंगळ ग्रहाभोवतीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामधील ५.४ लाख किलोमीटर एवढ्या त्रिज्येच्या कक्षेत हे मंगळयान पोचले असल्याचे ‘इस्रो‘ने म्हटले आहे.

छोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर !

•सप्टेंबर 18, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांच्या एका पथकास एका तुलनेने छोट्या असलेल्या आकाशगंगेमधील अजस्त्र कृष्णविवराचा शोध लागला आहे. या पथकामध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

या आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी कोणत्याही साधनाशिवाय केवळ डोळ्यांनी पाहिल्यास आकाश कमीतकमी 10 लाख ताऱ्यांनी लखलखताना दिसेल, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. आपल्या आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी सुमारे चार हजार तारे दिसतात. याचबरोबर, या कृष्णविवराचे वस्तुमान ‘मिल्की वे‘ या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराच्या पाचपट इतके प्रचंड आहे. आजपर्यंतच्या सर्वांत घनदाट आकाशगंगेमध्ये हे कृष्णविवर आढळून आले आहे. आपल्या आकाशगंगेच्या व्यासाच्या तुलनेमध्ये या आकाशगंगेचा व्यास 1/500 इतका कमी आहे. नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीच्या माध्यमामधून मिळालेल्या माहितीचा वापर करुन या संशोधकांनी हा शोध लावला आहे.

विश्‍वामध्ये अजस्त्र कृष्णविवरे असलेल्या अनेक छोट्या आकाशगंगाही असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या संशोधनामधून काढण्यात आला आहे. याचबरोबर, दोन वा अधिक आकाशगंगांच्या धडकेमधून तारकापुंज निर्माण होण्याऐवजी या छोट्या आकाशगंगांचा जन्म झाला असण्याची शक्‍यताही या संशोधनामधून पुढे आली आहे. अनिल सेठ या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृवाखालील शस्त्रज्ञांच्या पथकाने हे यश मिळविले आहे.

नव्या रक्तबटू ताऱ्याचा शोध

•एप्रिल 28, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

dwarf

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पृथ्वीपासून अवघ्या ७.२ प्रकाशवर्षे अंतरावर नवा रक्तबटू तारा (ब्राउन ड्वार्फ) सापडला आहे. हा ताराही पृथ्वीच्या उत्तर धृवाइतकाच थंड असून या शोधामुळे विश्वाच्या भविष्यातील वाटचालीविषयीच्या विचारांना गती मिळणार आहे.

एखाद्या ताऱ्यातील अणुइंधन संपल्यानंतर त्या ताऱ्याचे तापमान झपाट्याने कमी होते आणि त्याचे रूपांतर रक्तबटू ताऱ्यामध्ये होते. ‘नासा’च्या ‘वाइड-फिल़् इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर’ आणि स्पित्झर स्पेस दुर्बिणीतून मिळालेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा तारा शोधून काढला आहे. या ताऱ्याला ‘डब्ल्यूआयएसई जे०८५५१०.८३-०७१४४२.५’ असे नाव देण्यात आले आहे. या ताऱ्याचे तापमान उणे ४८ ते उणे १३ अंश सेल्सिअस इतके आहे. आतापर्यंत सापडलेल्या ताऱ्यांपैकी हा तारा सर्वाधिक थंड असून, आतापर्यंतच्या ताऱ्यांचे तापमान पृथ्वीवरील सामान्य तापमानाइतकेच असायचे. आपल्या सूर्यमालेपासून जवळच्या ताऱ्यांच्या क्रमवारीमध्ये हा रक्तबटू तारा चौथ्या क्रमांकावर असेल. या ताऱ्याचा आकार गुरूपेक्षा दहापटीने मोठा आहे, मात्र त्याचे वजन गुरू ग्रहाएवढेच आहे.
‘आपल्या सूर्यमालेपासून इतक्या जवळ एखाद्या ताऱ्याचा शोध लागणे, हा खूपच उत्साहवर्धक शोध आहे. या ताऱ्याचा अभ्यास करणे खूपच रंजक ठरणार आहे. या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरत असेल, तर त्याचे तापमानही तितकेच कमी असेल. ही बाबही खूपच महत्त्वाची असेल,’ असे पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या अवकाश संशोधन व अवकाश भौतिकी विभागातील सहायक प्राध्यापक केव्हिन ल्युहमॅन यांनी सांगितले.

“मंगळयानाने निम्मे अंतर कापले”

•एप्रिल 10, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

भारताच्या मंगळयानाने पाठवलेला एक संदेश सकाळी मिळाल्यावर इस्त्रोमधे एकच जल्लोश सुरु झाला. संदेश होता –

“मंगळयानाने नियोजित लक्ष्याच्या दिशेने निम्मे अंतर कापले”

Image

 

भारताच्या मंगळयानाने त्याच्या प्रवासातील निम्मे अंतर आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी कापल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली.गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी भारताने “मंगळयान’ पीएसएलव्ही- सी 25 या प्रक्षेपकाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात सोडले होते. यानंतर 11 डिसेंबरला ते पृथ्वीची कक्षा सोडून त्याच्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावले होते. या यानावर इस्रो नासा-जेपीएलच्या मदतीने कायम लक्ष ठेवून असते. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार या यानासह त्याच्यावरील पाच शास्त्रीय उपकरणेही उत्तम स्थितीत आहेत. आता यान आणि पृथ्वीतील अंतर 39 दशलक्ष कि.मी. एवढे असल्याने यानावरील संदेश पृथ्वीवर येण्यास सुमारे चार मिनिटे आणि 15 सेकंद इतका वेळ लागत आहे. हे यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोचणे अपेक्षित आहे. हा प्रवास यशस्वी झाल्यास, ही भारताची अंतराळ मोहिमेतील सर्वांत दूरची मोहीम ठरेल. आपले “मंगळयान’ मंगळावर गेल्यास पहिल्याच प्रयत्नांमध्ये मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश ठरेल. इस्रोच्या 500 शास्त्रज्ञांच्या गटाने 15 महिन्यांमध्ये हे “मंगळयान’ तयार केले आहे.

 
जगभरातून मंगळासाठी राबविलेल्या 51 अवकाश मोहिमांपैकी 27 मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनाच मंगळ मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या आहेत.

1,337 किलोग्रॅम
उड्डाणाच्या वेळी वजन

500 किलोग्रॅम
यानाचे वजन

15 किलोग्रॅम
उपकरणांचे वजन

माहिती सौजन्य : ‘सकाळ’

अंतराळात नव्या ग्रहाचा शोध

•जानेवारी 12, 2014 • प्रतिक्रिया नोंदवा

 पीटीआय, वॉशिंग्टन:

 
खगोलवैज्ञानिकांनी मीन तारकासमूहात गुरूपेक्षा दुप्पट वस्तुमानाचा ग्रह शोधून काढला आहे. या तारकाप्रणालीत एका ताऱ्याभोवती हा नवीन ग्रह फिरत असून आपल्या सौरमालेच्या शेजारी बहुतारकीय प्रणालींचे प्रमाण जास्त असताना ही एकतारकीय प्रणाली वेगळी ठरली आहे. एक तारकीय प्रणालीतील ताऱ्यांची निर्मिती ही बहुतारकीय प्रणालीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होत असते, असे सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ स्फीफन केन यांनी सांगितले. 
बहुतारकीय प्रणालीत एकापेक्षा दोन ग्रहीय चकत्या असतात, त्यात ग्रहांचा जन्म होतो. एखादा जादाचा तारा हा विध्वंसक ठरू शकतो व त्याचे गुरूत्व प्राथमिक रूपातील ग्रहांना एकमेकांपासून दूर लोटू शकते. बहुतारकीय प्रणालीत फार कमी सौरमालाबाह्य़ग्रह सापडले आहेत; पण ते आहेत हे मात्र नक्की, असे ते म्हणाले.
केन यांनी हवाई येथील जेमिनी नॉर्थ ऑब्झर्वेटरी येथे ऑप्टिकल इमेजिंग तंत्राने चार तारकीय प्रणालींचा अभ्यास केला. प्रत्येक प्रणालीत त्यांना सौरमाला बाह्य़ ग्रह सापडले व त्यांच्या त्रिज्यात्मक वेगातील बदल पाहून कुठला तारा पृथ्वीपासून किती दूर व किती जवळ जात आहे, याचा अभ्यास त्यांनी केला.
शोध सुरूच..
जवळच्या पदार्थामुळे एखाद्या ताऱ्यावर जे गुरूत्वीय बल कार्य करीत असते त्यामुळे ग्रहांवर जी क्रिया घडते त्याला ‘वुबलिंग’ असे म्हणतात. केन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या तारकीय प्रणालींचा अभ्यास केला त्यात त्रिज्यात्मक वेगाच्या बदलातील माहितीचे स्पष्टीकरण काही बाबतीत परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या गुरूत्वाच्या आधारे करता आले नाही.

आयसॉनच्या ठिकर्‍या विसरा आणि आकाशातली दिवाळी पहा

•डिसेंबर 13, 2013 • प्रतिक्रिया नोंदवा

येणार येणार म्हणून गाजलेल्या आयसॉन धूमकेतूच्या सूर्याच्या उष्णतेमुळे ठिकर्‍या उडाल्या आणि लाखो खगोलप्रेमींच्या अपेक्षांचा चुराडा झाला. असो. तरी पण खगोलप्रेमींनी निराश होण्याचे कारण नाही.
माझे एक हौशी खगोलनिरिक्षक मित्र श्री. मंदार मोडक यांनी माझ्या निदर्शनास आकाशात साजरी होणारी एक महत्त्वाची दिवाळी निदर्शनास आणून दिली आहे.

ती खगोलीय घटना जशीच्या तशी श्री. मंदार मोडक यांच्याच शब्दांत:


आज १३ आणि उद्या १४ डिसेंबरला सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह असा Geminids
उल्का वर्षाव आहे. यात ताशी १०० उल्काही दिसू शकतात. मागील वर्षी मी पाहिल्या होत्या. पण यावर्षी रात्रभर एकादशीचा मोठा चंद्र आहे. त्यामुळे बहुतेक उल्का झाकोळ्ल्या जातील. पण उद्या पहाटे चंद्र ४:१५ ला मावळेल. मग आकाश अंधारेल. पश्चिम आकाशात मिथुन राशीतून किमान ६ वाजेपर्यंत उल्का दिसतील. तेजस्वी गुरू मिथुनेतच मुक्कामाला आहे.
१३/१४ हाच Peak आहे. शक्य असल्यास आज रात्रीही पाहण्यास हरकत नाही. पण उद्या पहाटे ४:१५ ते ६:०० हीच योग्य वेळ ठरेल.
मुख्य म्हणजे आकाश निरभ्र आहे.
पहा http://www.earthsky.org
पहा http://www.imo.net

खगोलप्रेमींची १३ व १४ डिसेंबरची रात्र अजिबात निराशा करणार नाही. मी देखील हा उल्कावर्षाव खूप वेळा पाहिला आहे व माझी कधीच निराशा झाली नाही. तेव्हा वर्षातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या या उल्का वर्षावाची दिवाळी साजरी करण्यास सज्ज व्हा.

जेमिनाईड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भव्य उल्कावर्षावासाठी पुढील २ नकाशांची मदत नक्की होईल.

ImageImage 

नकाशे जालावरुन साभार

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.