“नासा” संस्थेचे मंगळ मोहिमेसाठी कल्पना सुचविण्याचे आवाहन

•मे 6, 2015 • टिपणी करा

वॉशिंग्टन – नासाच्या महत्वाकांक्षी मंगळमोहिमदरम्यान मंगळावर दीर्घकाळ राहणाऱ्या मानवाच्या वास्तव्याबाबत नासाने खुले स्पर्धात्मक आवाहन करण्यात आले असून त्यासाठी कल्पना मागविण्यात येत आहेत. 

नासा मंगळावर मानवी वस्ती उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हा प्रकल्प आव्हानात्मक असून अंतराळवीरांना निरनिराळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पादरम्यान अंतराळामध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींसाठी विविध कल्पना मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये वास्तव्य, अन्न, पाणी, श्‍वासोच्छवासासाठी प्राणवायू, संपर्क यंत्रणा, व्यायाम तसेच औषधोपचरांबाबत कल्पना मागविण्यात आल्या आहेत. “यामध्ये सहभागी होणाऱ्यांना या उदाहरणांच्या पलिकडे काही कल्पक आणि नाविन्यपूर्ण घटकांबाबत विचार करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे‘ असे नासाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विजेत्याला पाच हजार डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच पुरस्कारांची एकूण रक्कम 15 हजार डॉलर्स आहे. सहभागींना मंगळाच्या पृष्ठभागाच्या क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार करून पृथ्वीवरील कमीत कमी मदतीशिवाय मोहिम यशस्वी करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्पकता, कल्पकता, साधेपणा, संसाधनांची कार्यक्षमता, व्यवहार्यता, सर्वसमावेशकता या बाबींच्या आधारे यशस्वी सहभागीची निवड करण्यात येणार आहे.

पुढील दुव्यावरुन नासाच्या या उपक्रमाची माहिती मिळेल. तसेच पारितोषिक किती व कसे असेल याचीही माहिती मिळेल. : http://www.nasa.gov/solve/marsbalancechallenge

माहिती स्त्रोतः नासा वेबसाईट व ईसकाळ.कॉम

माहिती असलेल्या विश्‍वातील सर्वांत जुन्या सूर्यमालिकेचा शोध

•जानेवारी 28, 2015 • टिपणी करा

वॉशिंग्टन – खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकास अमेरिकेच्या केपलर या दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेत असताना विश्‍वामधील सर्वांत जुनी सूर्यमालिका शोधण्यात यश आले आहे. या सूर्यमालिकेमध्ये एकूण पाच ग्रह आढळले असून, ही सूर्यमालिका विश्‍वाच्या जन्माच्या वेळेनंतर काहीच कालावधीमध्ये निर्माण झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

या सूर्यमालिकेमधील मुख्य तारा केपलर ४४४ हा आहे. केपलर हा सूर्यासारखाच तारा असून तो सुमारे ११.२  अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. या काळामध्ये विश्‍वाचे वय आत्तापेक्षा २० टक्‍क्‍यांनी कमी होते, असे या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या संशोधनामध्ये स्पष्ट केले आहे. पृथ्वी असलेल्या आपल्या सूर्यमालिकेचे वय “केवळ‘ ४.५ अब्ज वर्षे आहे!

“या संशोधनामुळे विश्‍वाच्या १३.८  अब्ज वर्षांच्या इतिहासामध्ये पृथ्वीसारखे ग्रह अनेक निर्माण झाले असल्याच्या शक्‍यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या ग्रहांवर पुरातन जीवव्यवस्था असण्याची शक्‍यता आहे,‘‘ असे या संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व बर्मिंगहॅम विद्यापीठाने केले होते. या पथकामध्ये डेन्मार्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, जर्मनी व इटलीच्या संशोधकांचा समावेश होता.

केपलर ४४४ हा तारा सूर्यापेक्षा सुमारे २५ टक्‍क्‍यांनी लहान असून, ही सूर्यमालिका पृथ्वीपासून ११७ प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालिकेमधील पाचही ग्रहांचे क्षेत्रफळ पृथ्वीपेक्षा कमी आहे. या सूर्यमालिकेमधील सर्व ग्रह दहा दिवसांपेक्षाही कमी दिवसांत केपलर ४४४ ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतात. या नव्या संशोधनामुळे प्राचीन ग्रहांच्या निर्मितीसंदर्भातील बहुमोल माहिती हाती लागण्याची शक्‍यता आहे.

“लव्हजॉय” धूमकेतूचे मनोवेधक दर्शन

•डिसेंबर 30, 2014 • टिपणी करा

ऑस्ट्रेलियन धूमकेतू शोधक टेरी लव्हजॉय याने १७ ऑगस्ट २०१४ ची पहाट होण्यापूर्वी हा धूमकेतू सर्वप्रथम पाहिला.२००७ सालापासून या धूमकेतू शोधकाने शोधलेला हा पाचवा धूमकेतू. टेरी लव्हजॉय ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड प्रांतातील बर्कडेल येथून आकाश निरिक्षण करत असताना या धूमकेतूचा शोध लावला.

comet-lovejoy-12-29-2014-Singapore-Justin-NG1

 

एका संकेतस्थळाशी दिलेल्या मुलाखतीत टेरी लव्हजॉय ने हा धूमकेतू कसा शोधला ते थोड्या सोप्या शब्दांत सांगितले. हल्ली दूरदर्शीतील तंत्र आधुनिक होत चालले आहे. त्यातील इमेजिंग प्रणालीचा वापर करुन लव्हजॉय ने दर दहा मिनिटांच्या अंतराने तीन फोटो घेतले. थोड्या अंतराने घेतलेले फोटो हे धूमकेतू शोधण्याच्या कामात अतिशय उपयोगी ठरतात. जर एखादा धूमकेतू अथवा उल्का आकाशात असेल तर ती अशा थोड्या थोड्या अंतराने घेतलेल्या फोटोंमधून जागा बदलण्याच्या घटकामुळे लगेच सापडते.
जिज्ञासूंनी हा लव्हजॉय धूमकेतू अवश्य बघावा. सध्या तो मृग नक्षत्रात आहे आणि हळुहळु उत्तरेकडे सरकत जाणार आहे. जानेवारीत बरा दिसेल. छोट्याश्या दुर्बिणीच्या अथवा द्विनेत्रीच्या साहाय्याने बघितल्यास धूमकेतू बघण्याचे नेत्रसुख मिळवता येईल.

लव्हजॉय या धूमकेतूचा १६ जानेवारी २०१४ पर्यंतचा मार्ग:

LoveJoy_Comet_path_till_16Jan15

धूमकेतूवर प्रथमच उतरवला यंत्रमानव!

•नोव्हेंबर 13, 2014 • टिपणी करा

फ्रॅंकफर्ट – युरोपियन स्पेस एजन्सीच्या “रोसेटा‘ या अंतराळयानाने “67 पी‘ (च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्को) या धूमकेतूवर “फिली‘ या नावाचा यंत्रमानव यशस्वीरीत्या उतरवला आहे. धूमकेतूवर यंत्रमानव उतरविण्याची अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या यंत्रमानवाकडून पहिला रेडिओ संदेश मिळाला आहे. या यंत्रमानवाकडून लवकरच छायाचित्रे प्राप्त होण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Rosetta_orbiting_Comet_67P_Churyumov-Gerasimenko

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास “रोसेटा‘ या अंतराळयानातून “फिली‘ला धूमकेतूच्या दिशेने सोडले. “”हा यंत्रमानव “फ्री-फॉल‘ करीत धूमकेतूच्या दिशेने गेला. यंत्रमानव उतरलेल्या ठिकाणाला “अगिल्किया‘ हे नाव देण्यात आले आहे. ही प्रक्रिया खूपच किचकट व विमानामधून एखादे वॉशिंग मशीन खाली फेकण्यासारखी होती. एवढ्या मोठ्या उंचीवरून यंत्रमानवाचे तुकडे होण्याची भीती होती व त्याचबरोबर नियोजित जागी त्याला उतरविणे हेही मोठे आव्हान होते. मात्र, या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाल्या आहेत. ही प्रक्रिया पृथ्वीपासून 50 कोटी 90 लाख किलोमीटर उंचीवर घडली,‘‘ असेही संशोधकांनी स्पष्ट केले.

हा यंत्रमानव धूमकेतूवरील खोल खड्डे आणि बर्फाचे डोंगर अशा विचित्र पृष्ठभागाचा अभ्यास करणार असून, सौरमालेच्या जन्मामध्ये धूमकेतूंचा कसा सहभाग होता, हे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

हा धूमकेतू सूर्याभोवती एक फेरी मारण्यास 6.45 वर्षे घेतो व त्याची कक्षा सूर्यापासून कमीत कमी 18 कोटी किलोमीटर, तर अधिकाधिक 84 कोटी किलोमीटर आहे.

“मॉम‘नेही “टिपला‘ धूमकेतू
भारताच्या मंगळयानाने “67 पी‘ या धूमकेतूचे एक महिन्यापूर्वी टिपलेले छायाचित्र “इस्रो‘ने बुधवारी प्रसिद्ध केले. या धूमकेतूचे दर्शन मंगळयानाला 19 ऑक्‍टोबरला झाले होते. त्या वेळी “मॉम‘ने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते, “”बापरे, लक्षात राहण्यासारखा अनुभव. धूमकेतूला अगदी जवळून वेगाने जाताना पाहिले. मी माझ्या कक्षेतच आहे, सुरक्षित आणि सुस्थितीत!‘‘ मंगळयानाच्या कॅमेराने धूमकेतूच्या “कोमा‘ या पृष्ठभागावरील प्रकाशमान भागाचे छायाचित्र काढले आहे.
Rosetta_and_its_target_comet
रोसेटा अंतराळयानाबद्दल…
अंतराळात झेप : 2 मार्च 2004
धूमकेतूच्या कक्षेत प्रवेश : 6 ऑगस्ट 2014
उपकरणे : तीन स्पेक्‍ट्रोस्कोप, एक मायक्रोस्कोप रेडिओ अँटेना आणि एक रडार

“रोसेटा‘च्या मोहिमेची वैशिष्ट्ये
– धूमकेतूच्या मार्गावर यानाने उपग्रहांच्या पट्ट्यामधून मार्गक्रमण केले असून, असा प्रवास करणारे ते पहिले युरोपियन यान.
– सौरऊर्जेचा वापर करीत गुरूच्या कक्षेजवळून गेलेले “रोसेटा‘ हे पहिलेच अंतराळयान.
– धूमकेतूच्या बरोबर त्याच्याच वेगाने प्रवास करणारे हे पहिलेच अंतराळयान असून, धूमकेतूवर सूर्याच्या उष्णतेमुळे काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारे हे पहिले यान ठरणार.
– धूमकेतूवर प्रथमच एखादी वस्तू (यंत्रमानव) उतरविण्यात आला असून, त्याच्या पृष्ठभागावरून प्रथमच छायाचित्रे मिळतील.
– धूमकेतूवरील खनिजांचा त्यावर उतरून केलेला हा पहिलाच अभ्यास ठरेल.
माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम
छायाचित्रे सौजन्य : जालावरुन साभार

मंगळ मोहीम- लिक्विड इंजिनचे यशस्वी प्रक्षेपण

•सप्टेंबर 22, 2014 • टिपणी करा

मंगळयान ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण प्रभावकक्षेत दाखल

बंगळूर / चेन्नई- विक्षेपी गतिमार्गातील चौथा टप्पा पार करून मंगळाच्या दिेशेने आघाडी घेताना मंगळयानावरून मेन लिक्विड इंजिनचे प्रक्षेपण आज (सोमवारी) दुपारी अडीच वाजता यशस्वीपणे करण्यात आले.

ऐतिहासिक मंगळ मोहिमेसाठी (मार्स ऑर्बिटर मिशन- मॉम) उड्डाण केलेले भारताचे मंगळयान सोमवारी मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असलेल्या कक्षेत पोचले आहे. हे यान २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रत्यक्ष प्रवेश करणार आहे.

‘आमचे दिशादर्शक यंत्र (नेव्हिगेटर) दाखवत आहे की ‘मॉम‘ने मंगळाच्या प्रभावगोलामध्ये प्रवेश केला आहे,‘ असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
मंगळ ग्रहाभोवतीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामधील ५.४ लाख किलोमीटर एवढ्या त्रिज्येच्या कक्षेत हे मंगळयान पोचले असल्याचे ‘इस्रो‘ने म्हटले आहे.

छोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर !

•सप्टेंबर 18, 2014 • 2 प्रतिक्रिया

वॉशिंग्टन – अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांच्या एका पथकास एका तुलनेने छोट्या असलेल्या आकाशगंगेमधील अजस्त्र कृष्णविवराचा शोध लागला आहे. या पथकामध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

या आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी कोणत्याही साधनाशिवाय केवळ डोळ्यांनी पाहिल्यास आकाश कमीतकमी 10 लाख ताऱ्यांनी लखलखताना दिसेल, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. आपल्या आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी सुमारे चार हजार तारे दिसतात. याचबरोबर, या कृष्णविवराचे वस्तुमान ‘मिल्की वे‘ या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराच्या पाचपट इतके प्रचंड आहे. आजपर्यंतच्या सर्वांत घनदाट आकाशगंगेमध्ये हे कृष्णविवर आढळून आले आहे. आपल्या आकाशगंगेच्या व्यासाच्या तुलनेमध्ये या आकाशगंगेचा व्यास 1/500 इतका कमी आहे. नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीच्या माध्यमामधून मिळालेल्या माहितीचा वापर करुन या संशोधकांनी हा शोध लावला आहे.

विश्‍वामध्ये अजस्त्र कृष्णविवरे असलेल्या अनेक छोट्या आकाशगंगाही असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या संशोधनामधून काढण्यात आला आहे. याचबरोबर, दोन वा अधिक आकाशगंगांच्या धडकेमधून तारकापुंज निर्माण होण्याऐवजी या छोट्या आकाशगंगांचा जन्म झाला असण्याची शक्‍यताही या संशोधनामधून पुढे आली आहे. अनिल सेठ या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृवाखालील शस्त्रज्ञांच्या पथकाने हे यश मिळविले आहे.

नव्या रक्तबटू ताऱ्याचा शोध

•एप्रिल 28, 2014 • टिपणी करा

dwarf

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पृथ्वीपासून अवघ्या ७.२ प्रकाशवर्षे अंतरावर नवा रक्तबटू तारा (ब्राउन ड्वार्फ) सापडला आहे. हा ताराही पृथ्वीच्या उत्तर धृवाइतकाच थंड असून या शोधामुळे विश्वाच्या भविष्यातील वाटचालीविषयीच्या विचारांना गती मिळणार आहे.

एखाद्या ताऱ्यातील अणुइंधन संपल्यानंतर त्या ताऱ्याचे तापमान झपाट्याने कमी होते आणि त्याचे रूपांतर रक्तबटू ताऱ्यामध्ये होते. ‘नासा’च्या ‘वाइड-फिल़् इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर’ आणि स्पित्झर स्पेस दुर्बिणीतून मिळालेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा तारा शोधून काढला आहे. या ताऱ्याला ‘डब्ल्यूआयएसई जे०८५५१०.८३-०७१४४२.५’ असे नाव देण्यात आले आहे. या ताऱ्याचे तापमान उणे ४८ ते उणे १३ अंश सेल्सिअस इतके आहे. आतापर्यंत सापडलेल्या ताऱ्यांपैकी हा तारा सर्वाधिक थंड असून, आतापर्यंतच्या ताऱ्यांचे तापमान पृथ्वीवरील सामान्य तापमानाइतकेच असायचे. आपल्या सूर्यमालेपासून जवळच्या ताऱ्यांच्या क्रमवारीमध्ये हा रक्तबटू तारा चौथ्या क्रमांकावर असेल. या ताऱ्याचा आकार गुरूपेक्षा दहापटीने मोठा आहे, मात्र त्याचे वजन गुरू ग्रहाएवढेच आहे.
‘आपल्या सूर्यमालेपासून इतक्या जवळ एखाद्या ताऱ्याचा शोध लागणे, हा खूपच उत्साहवर्धक शोध आहे. या ताऱ्याचा अभ्यास करणे खूपच रंजक ठरणार आहे. या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरत असेल, तर त्याचे तापमानही तितकेच कमी असेल. ही बाबही खूपच महत्त्वाची असेल,’ असे पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या अवकाश संशोधन व अवकाश भौतिकी विभागातील सहायक प्राध्यापक केव्हिन ल्युहमॅन यांनी सांगितले.