नभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

भाग १: व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

लेखमालेच्या मागच्या भागात आपण पाहिले की तार्‍याची तेजस्विता म्हणजे काय? आणि ही तेजस्विता कोणत्या २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते?

तार्‍यांची तेजस्विता पुढील २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते
१. तार्‍याचे तापमान
आणि
२. तार्‍याचे आकारमान

तर या पहिल्या भागात आकारमान या घटकाच्या अनुषंगाने ज्ञात खगोलविश्वातील आकाराने सर्वात मोठा तारा व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस याचा आढावा आपण घेऊयात.

व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची माहिती घेण्याअगोदर पुढील एक चित्र पाहूयात.
पुढील तुलनात्मक चित्रामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्याला एवढ्या लांब अंतरावरुन घामाच्या धारा आणण्याची क्षमता असलेला आपला हा सूर्य विश्वाच्या पसार्‍यातील एक नगण्य तारा आहे. असे असले तरी पृथ्वीसारख्या ग्रहावर आपणा मानवांची जी उत्क्रांती झालेली आहे त्यामुळे हाच नगण्य असलेला हा सूर्य एक अतिमहत्त्वाचा तारा होतो.
पुढील चित्रात सूर्य, अ‍ॅक्टरस (स्वाती हा तारा) आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍यांची तुलना केलेली आहे.
हे चित्र पाहताना कॄपया हे ध्यानात घ्यावे की यातील स्वाती या तार्‍याचे आकारमान शनी ग्रहाच्या भ्रमणकक्षे एवढे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस च्या पोटात आपण कुठे असू याचा थोडाफार अंदाज बांधता येईल हास्य

या चित्रानंतर थेट सूर्य आणि व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ही तुलना पहा.

अजून एक तुलना:

सूर्य आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस
संपूर्ण आकाराशी तुलना:

कॅनिस मेजॉरिस बद्दल दोन मुख्य विरोधी मते आहेत. एक विचार असा आहे की हा जास्त करुन वायुचा गोळा अधिक आहे ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग प्रत्यक्षात मंगळ ग्रहाच्या कक्षेइतकाच असू शकेल.
पण सर्वमान्य सिद्धांतानुसार व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिसचे आकारमान तेवढेच आहे जेव्हढ्याचा अंदाज केला आहे.
दिलेली चित्रे वाचकांना ‘अबबब’ म्हणायला आणि थोडेफार मंथन करण्यासाठी पुरेशी ठरावीत wink

खुलासा: या लेखात वापरण्यात येणारी अथवा वापरली गेलेली सर्व छायाचित्रे मायाजालावरुन घेण्यात आलेली आहेत. त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यात माफक बदल मी केले आहेत.

आता व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या अवाढव्य तार्‍याची थोडी माहिती पाहूयात.

आपल्या सूर्यापेक्षा जवळपास २,१०० पटींने मोठ्या आकाराचा असा हा लाल रंगाचा राक्षसी तारा आहे.
आपल्यापासून व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ४,९०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजेच या तार्‍याचे जे स्वरुप आज आपण पाहतो आहे ते ४,९०० वर्षांपूर्वीचे पाहतो आहे. आत्ता चालू क्षणी तिथे काय परिस्थिती असेल हे माहिती करुन घेण्याचे कोणतेही तंत्र आपल्याकडे उपलब्ध नाही. लाल रंगाच्या राक्षसी तार्‍याची परिणती सर्वसाधारणपणे सुपरनोव्हा म्हणजे महास्फोटात होते त्यामुळे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस हा तारा आज अस्तित्त्वात असण्याची शक्यता कमीच आहे.

व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस हा बृहल्लुब्धक म्हणून ओळखला जातो. आकाशातील याचे स्थान ओळखायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम लुब्धक (शिकार्‍याचा कुत्रा) या तारकासमूहाची माहिती करुन घ्यावी लागेल. या तारकासमूहातील हा तारा व्ही.वाय. या नावाने ओळखला जातो. या तारकासमूहात अनेक महाकाय तारे आहेत जे आपल्या सूर्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. पण त्या सर्वांत व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस आकाराने मोठा असल्याने भाव खाऊन जातो व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते.

ग्रीक पुराणकथांनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा हा बृहल्लुब्धक (कॅनिस मेजॉरिस) मानला जातो. राजन्य (इंग्रजी नाव रिगेल) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे. दृश्यप्रत म्हणजे तार्‍याची तेजस्विता. दृश्यप्रत कशी मोजतात? तर एखाद्या तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्य प्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्य प्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

पुढील नकाशावरुन आकाशात मृगनक्षत्र शोधता येईल. मृग नक्षत्रातील व्याधाचा तारा म्हणजे नभोमंडलाचे भूषणच आहे. यासारखा दुसरा तेजस्वी तारा आकाशात दिसत नाही. त्यामुळे व्याधाच्या तार्‍याजवळच व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस शोधता येईल. आकाशातील अतितेजस्वी तार्‍याच्या शेजारीच आकाराने सर्वात मोठा असलेला तारा असा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो हे आपले एक भाग्यच म्हटले पाहिजे.

व्याधाच्या (सिरस) तार्‍याभोवती मी गुलाबी रंगाने २ गोल केले आहेत , त्यावरुन कॅनिस मेजॉरिस शोधायला अडचण पडू नये. मृग नक्षत्र जवळपास सर्वांनाच माहिती असते, तरीसुद्धा दिलेल्या नकाशाच्या आकारावरुन व पुढील चित्रावरुन आकाशात हे मृगनक्षत्र ओळखता यावे.

बृहल्लुब्धकाचा हा भाग किती महत्त्वाच्या तार्‍यांनी भरलेला आहे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट होईल.

तर

हबल टेलिस्कोप ने टिपलेले या महाकाय तार्‍याचे  नेत्रसुखद दॄष्य

आणि सर्वात शेवटी व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची आपल्या ग्रहमालेतील महाकाय वाटणार्‍या ग्रहांशी तुलना किती अर्थहीन आहे हे दाखवणारे हे चित्र

खगोलविश्व : पश्चिम क्षितिजावर शुक्र आणि बुध या ग्रहांचे विहंगम दृश्य

(१२ नोव्हेंबर २०११)

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

 

 

आकाशातले ग्रह तारे नेहमीच आपल्याला मोहीनी घालत आले आहेत. सध्या असेच एक सुंदर दृश्य पश्चिम क्षितिजाची शोभा वाढवत आहे. नुसत्या डोळ्यांनी पूर्व क्षितिजावर “शुक्र” आणि “बुध” हे ग्रह अगदी एकमेकांच्या शेजारी दिसत आहेत. प्रत्यक्षात एकमेकांपासून कित्येक कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन ग्रहांची ही युती आभासी असली तरी आपल्या पृथ्वीवासियांसाठी एक विहंगम खगोलीय घटना आहे. तेव्हा पश्चिम क्षितिजावर संध्याकाळी दिसणारे दॄष्य कसे होते ते कालच्या या सूर्यास्तानंतर लगेचच घेतलेल्या छायाचित्रात पहा आणि पुढचे कित्येक दिवस तुम्ही प्रत्यक्ष पाहून या खगोलीय घटनेचा आस्वाद घ्या. शक्यतो बुध आणि शुक्र हे २ ग्रह एवढ्या जवळ दिसत नाहीत. पण सध्या यांची युती अगदी रंगात आली आहे

गुरु सध्या चंद्राच्या जवळ आहे. पण नेहमी ही स्थिती रहात नाही याचे कारण चंद्र आपल्या पृथ्वीभोवती भ्रमण करायला २७.३ दिवस घेतो, त्यामुळे दर दिवशी तो उगवतो ती वेळ वेगळी असते.

शुक्राचे तेज गुरुच्या तुलनेत जास्त असते म्हणून वरील चित्रात तो सर्वात ठळक दिसतोय. तेजस्वितेच्या बाबतीत गुरु महाराजांचा क्रमांक शुक्र महोदयानंतर लागतो wink

चित्रात गुरु नाहिये
तो असा दुसर्‍या बाजूला होता…

 

 

सध्या आकाशात अनेक विहंगम दृश्ये बघावयास मिळत आहेत. येत्या १५ – १९ नोव्हेंबर दरम्यान रात्री आकाशात उल्कांचा वर्षाव दिसणार आहे.

पण हे झाले कधीतरी घडणार्‍या खगोलीय घटनांबाबत. चित्रा आणि स्वाती या जेव्हा आकाशात प्रवेश करतात तेव्हा अर्ध्या आकाशाचे वैभव हिरावून दिमाखदारपणे चमकत असतात.

सप्तर्षी तारका समूहातील पहिल्या दोन तारकांना जोडून एक रेषा सरळ काढली की आपल्याला ध्रुव तारा दिसतो. तद्वतच चित्रा आणि स्वातीचा शोध घेण्यासाठी सप्तर्षी च्या शेवटच्या दोन तारकांचा आधार घ्यावा लागतो. खरे तर या तारकांचे तेजच त्यांची ओळख आहे. पण नवख्या माणसाला ह्याच चित्रा आणि स्वाती आहेत याची खात्री पटवण्यासाठी सप्तर्षीचे शेपूट उपयोगी पडते.
चित्रा आणि स्वाती अशा दिसतात. त्यांना कसे ओळखायचे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट व्हावे.

From

चित्राचे इंग्रजी नाव आहे स्पायका आणि स्वातीचे आहे आर्क्टरस

चित्रा ही सूर्यापुढे थोडी लाजते. एक नीलवर्णी बटू तारा आहे हा.

स्वाती मात्र त्याबाबतीत एकदम बिनधास्त आहे. स्वाती हा तारा दिसतो खूप मनोरम. पण आपल्या सूर्यमहाराजांचे हिच्यापुढे काहीच चालत नाही. भास्कर महाराजांची नजर कायम झुकलेलीच असती या स्वातीपुढे. आपल्या सूर्याच्या तुलनेत ही स्वाती त्याला अगदी कडेवर घेऊन फिरेल अशी महाकाय आहे. केव्हढी ते पुढील चित्रावरुन स्पष्ट व्हावे.

सूर्यमालेतील शनि ग्रहाची कक्षा जेवढी आहे तेवढा या स्वातीचा आकार आहे. एक राक्षसी तारा असल्यामुळे स्वातीचा आकार दिवसेंदिवस फुगत चालला आहे.

सध्या या चित्रा आणि स्वातीचे सौंदर्य पश्चिम आकाशात रात्री केव्हाही पाहता येईल. साडे-आठ साडे- नऊ ही योग्य वेळ ठरावी.

 


या लेखातील व माझ्या प्रतिसादांत वापरण्यात आलेली छायाचित्रे वा रेखाचित्रे मायाजालावरुन घेतलेली आहेत. आवश्यकतेनुसार मी थोडे फार बदल केले आहेत. या सर्व चित्रांचे हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत