आयसॉन धूमकेतूचे टप्प्यात येणे लांबले

खगोलविश्वः २८ नोव्हेंबर २०१३, गुरुवार

बहुप्रतिक्षित आयसॉन या धूमकेतूचे मानवाच्या साध्या डोळ्यांच्या टप्प्यात येणे थोडेसे लांबले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अर्थात खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार २७ नोव्हेंबर २०१३ च्या आसपास आयसॉन दिसणे अपेक्षित होते. पण आयसॉन धूमकेतू वेगाने सूर्याच्या जवळ जातो आहे. त्यामुळे सूर्याच्या तेजात तो साध्या डोळ्यांना दिसणे शक्य नाहिये. जस जसा आयसॉन सूर्याच्या जवळ जाईन तसतसा सूर्याच्या २७४० डिग्री एवढ्या तीव्र तापमानात – बर्फ आणि शिला यांच्यापासून तयार झालेला – हा धूमकेतू टिकू शकेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एवढ्या तीव्र तापमानामुळे आयसॉनवर स्फोट होणार आहेत हे नक्की. त्यातून हा धूमकेतू वाचला तर ३ डिसेंबरच्या आसपास आयसॉन नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल. त्यानंतरचा देखावा मात्र नेत्रसुखद असेन यात शंका नाही. कारण आयसॉन सूर्यापासून थोडा लांब आलेला असेल व बर्फ वितळून आयसॉनची शेपूटही तयार झालेली असेल. निसर्गाचे चमत्कार खरोखर अत्भुत असतात. पण त्यांच्या मुळाशी विज्ञानाची अतिशय प्राथमिक गणिते असतात. ती सर्वसामान्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

आयसॉन धूमकेतूचे दुर्बिणीतून टिपलेले ताजे चित्र:

Image

धूमकेतूची शेपूट कशी तयार होते?

सूर्याच्या अती उष्णतेमुळे कोणत्याही धूमकेतूवर जमा झालेला बर्फाचा थर वितळत तो धूमकेतूपासून मागे उरत जातो. मागे उरलेले हे कणच प्रकाश परावर्तित करुन धूमकेतूची शेपूट असल्याचा आभास आपल्याला करुन देतात. हा नेत्रसुखद देखावा पाहिला की मग निसर्गाचे हे अत्भुत वाटणारे कोडे सोपे असल्यासारखे वाटू लागते. तरीही ते आपल्याला अगम्यच वाटत राहते.
तर मित्रांनो – निसर्गाच्या या शक्तीकडे प्रार्थना करा की सूर्याच्या जवळ जाऊन आयसॉनचे तुकडे होऊ नयेत आणि ३ डिसेंबरच्या सुमारास आम्हाला तुझ्या अत्भुत सौंदर्याचे दर्शन या आयसॉन धूमकेतूच्या रुपाने घडू देत.

धन्यवाद
-सागर

आयसॉन धूमकेतूला आकाशात कोठे शोधता येईल त्यासाठीचा ताजा नकाशा सोबत जोडला आहे.

Image

 

छायाचित्रे सौजन्यः या लेखातील छायाचित्रे वा रेखाटने जालावरुन घेतलेली आहेत. त्यांचे अधिकार संबंधितांकडे सुरक्षित आहेत.

भारताचे यान मंगळाकडे यशस्वीपणे झेपावले…

भारताच्या “मंगळयाना’चे श्रीहरिकोटा येथून मंगळवारी (५ नोव्हेंबर २०१३ रोजी) यशस्वी प्रक्षेपण झाले. मंगळावर यान पाठविण्यास सुरवात झाली ती १९६० च्या दशकात. सर्वाधिक यशस्वी मंगळ मोहिमा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा’ने केल्या आहेत. मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया, युरोपीय समुदायानंतर मंगळाच्या कक्षेत यान पाठविणारा भारत हा चौथा देश ठरेल.

यासाठी भारताची मोहीम
– मंगळाच्या विरळ वातावरणाचा, भूरचनेचा अभ्यास करणे
– जीवसृष्टीच्या शक्‍यतेचा आणि भविष्यात मानवी वास्तव्य शक्‍य आहे का, याचा अभ्यास करणे
– मंगळावरील पाणी व कार्बन डायऑक्‍साईडच्या ऱ्हासाची कारणे शोधणे
– तेथील मिथेनच्या साठ्यांचा शोध घेणे
– दुसऱ्या ग्रहांवर याने पाठविण्याची आपली क्षमता सिद्ध करणे

असे आहे मंगळयान
– मोहिमेचा कालावधी – ३०० दिवस
– उड्डाणाच्या वेळी यानाचे एकूण वजन – १३५० किलो

– यानाचे वजन – ५०० किलो
– इंधनाचे वजन – ८५० किलो
– प्रक्षेपक – ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक – पीएसएलव्ही एक्‍सएल-सी२५
– खर्च – ४५० कोटी रुपये

यानावरील उपकरणे :
– लेमन अल्फा फोटोमीटर (एएलपी)- मंगळाच्या वातावरणातील ड्युटेरियम आणि हायड्रोजनच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी.
– मिथेन सेन्सर फॉर मार्स (एमएसएम)- मिथेनच्या प्रमाणाच्या नोंदी घेणे, त्याचा स्रोत शोधणे.
– मार्स एक्‍झोफेरिक न्यूट्रल कंपोझिशन अनेलायझर (एमईएनसीए) – मंगळाच्या बाह्यवातावरणाचा अभ्यास करण्यासाठी. मंगळाच्या वातावरणाच्या सर्वांत बाहेरच्या विरळ थरातील कणांचा अभ्यास करण्यासाठी.
– थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्‍ट्रोमीटर (टीआयएस) – वातावरणाच्या तापमानाच्या नोंदी घेण्यासाठी. पृष्ठभागावरील घटकांचे मॅपिंग करण्यासाठी.
– मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) – वर्णपटाच्या साह्याने छायाचित्रे काढण्यासाठी. पृष्ठभागाची छायाचित्रे काढण्यासाठी. फोबोस आणि डेमोस या मंगळाच्या उपग्रहांविषयी माहिती गोळा करण्यासाठी.

यानाचा प्रवास
– पीएसएलव्ही यानाला प्रथम ६०० किलोमीटर बाय २ लाख १५ हजार किलोमीटर लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करेल.
– पृथ्वीभोवती सहा प्रदक्षिणा घालून यानाचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
– मंगळाच्या कक्षेत प्रवेश २१ सप्टेंबर २०१४.
– मंगळाभोवतीची त्याची कक्षा ५०० किलोमीटर बाय ८० हजार किलोमीटर असेल.
– यानाचे नियंत्रण बंगळूर येथील इस्रोच्या इंडियन डीप स्पेस नेटवर्कद्वारे व “नासा’च्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे.

असा आहे मंगळ
– सूर्यमालेतील चौथा ग्रह
– पृष्ठभागावर आयर्न ऑक्‍साईड असल्याने तो तांबूस दिसतो.

– वातावरणातील घटक – कार्बन डायऑक्‍साईड (९५.३२ टक्के), नायट्रोजन (२.७ टक्के), अरगॉन (१.६ टक्के), ऑक्‍सिजन (०.१३ टक्के), बाष्प (०.०३ टक्के), नायट्रिक ऑक्‍साईड (०.०१ टक्के).
– वातावरणाचा दाब – सरासरी ७.५ मिलिबार (पृथ्वीवर समुद्र सपाटीला हवेचा दाब १०१३ मिलिबार असतो)
– सूर्यापासून अंतर – २२७, ९३६,६३७ किलोमीटर
– घनता – पृथ्वीपेक्षा ०.३७५
– दिवसाचा कालावधी – २४तास, ३७मिनिटे
– १ वर्ष = पृथ्वीवरील ६८७ दिवस

– उपग्रह किंवा चंद्र – दोन (फोबोस आणि डेमोस)