नव्या रक्तबटू ताऱ्याचा शोध

dwarf

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पृथ्वीपासून अवघ्या ७.२ प्रकाशवर्षे अंतरावर नवा रक्तबटू तारा (ब्राउन ड्वार्फ) सापडला आहे. हा ताराही पृथ्वीच्या उत्तर धृवाइतकाच थंड असून या शोधामुळे विश्वाच्या भविष्यातील वाटचालीविषयीच्या विचारांना गती मिळणार आहे.

एखाद्या ताऱ्यातील अणुइंधन संपल्यानंतर त्या ताऱ्याचे तापमान झपाट्याने कमी होते आणि त्याचे रूपांतर रक्तबटू ताऱ्यामध्ये होते. ‘नासा’च्या ‘वाइड-फिल़् इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर’ आणि स्पित्झर स्पेस दुर्बिणीतून मिळालेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा तारा शोधून काढला आहे. या ताऱ्याला ‘डब्ल्यूआयएसई जे०८५५१०.८३-०७१४४२.५’ असे नाव देण्यात आले आहे. या ताऱ्याचे तापमान उणे ४८ ते उणे १३ अंश सेल्सिअस इतके आहे. आतापर्यंत सापडलेल्या ताऱ्यांपैकी हा तारा सर्वाधिक थंड असून, आतापर्यंतच्या ताऱ्यांचे तापमान पृथ्वीवरील सामान्य तापमानाइतकेच असायचे. आपल्या सूर्यमालेपासून जवळच्या ताऱ्यांच्या क्रमवारीमध्ये हा रक्तबटू तारा चौथ्या क्रमांकावर असेल. या ताऱ्याचा आकार गुरूपेक्षा दहापटीने मोठा आहे, मात्र त्याचे वजन गुरू ग्रहाएवढेच आहे.
‘आपल्या सूर्यमालेपासून इतक्या जवळ एखाद्या ताऱ्याचा शोध लागणे, हा खूपच उत्साहवर्धक शोध आहे. या ताऱ्याचा अभ्यास करणे खूपच रंजक ठरणार आहे. या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरत असेल, तर त्याचे तापमानही तितकेच कमी असेल. ही बाबही खूपच महत्त्वाची असेल,’ असे पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या अवकाश संशोधन व अवकाश भौतिकी विभागातील सहायक प्राध्यापक केव्हिन ल्युहमॅन यांनी सांगितले.

“मंगळयानाने निम्मे अंतर कापले”

भारताच्या मंगळयानाने पाठवलेला एक संदेश सकाळी मिळाल्यावर इस्त्रोमधे एकच जल्लोश सुरु झाला. संदेश होता –

“मंगळयानाने नियोजित लक्ष्याच्या दिशेने निम्मे अंतर कापले”

Image

 

भारताच्या मंगळयानाने त्याच्या प्रवासातील निम्मे अंतर आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी कापल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली.गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी भारताने “मंगळयान’ पीएसएलव्ही- सी 25 या प्रक्षेपकाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात सोडले होते. यानंतर 11 डिसेंबरला ते पृथ्वीची कक्षा सोडून त्याच्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावले होते. या यानावर इस्रो नासा-जेपीएलच्या मदतीने कायम लक्ष ठेवून असते. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार या यानासह त्याच्यावरील पाच शास्त्रीय उपकरणेही उत्तम स्थितीत आहेत. आता यान आणि पृथ्वीतील अंतर 39 दशलक्ष कि.मी. एवढे असल्याने यानावरील संदेश पृथ्वीवर येण्यास सुमारे चार मिनिटे आणि 15 सेकंद इतका वेळ लागत आहे. हे यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोचणे अपेक्षित आहे. हा प्रवास यशस्वी झाल्यास, ही भारताची अंतराळ मोहिमेतील सर्वांत दूरची मोहीम ठरेल. आपले “मंगळयान’ मंगळावर गेल्यास पहिल्याच प्रयत्नांमध्ये मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश ठरेल. इस्रोच्या 500 शास्त्रज्ञांच्या गटाने 15 महिन्यांमध्ये हे “मंगळयान’ तयार केले आहे.

 
जगभरातून मंगळासाठी राबविलेल्या 51 अवकाश मोहिमांपैकी 27 मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनाच मंगळ मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या आहेत.

1,337 किलोग्रॅम
उड्डाणाच्या वेळी वजन

500 किलोग्रॅम
यानाचे वजन

15 किलोग्रॅम
उपकरणांचे वजन

माहिती सौजन्य : ‘सकाळ’