धूमकेतूवर प्रथमच उतरवला यंत्रमानव!

फ्रॅंकफर्ट – युरोपियन स्पेस एजन्सीच्या “रोसेटा‘ या अंतराळयानाने “67 पी‘ (च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्को) या धूमकेतूवर “फिली‘ या नावाचा यंत्रमानव यशस्वीरीत्या उतरवला आहे. धूमकेतूवर यंत्रमानव उतरविण्याची अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या यंत्रमानवाकडून पहिला रेडिओ संदेश मिळाला आहे. या यंत्रमानवाकडून लवकरच छायाचित्रे प्राप्त होण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Rosetta_orbiting_Comet_67P_Churyumov-Gerasimenko

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास “रोसेटा‘ या अंतराळयानातून “फिली‘ला धूमकेतूच्या दिशेने सोडले. “”हा यंत्रमानव “फ्री-फॉल‘ करीत धूमकेतूच्या दिशेने गेला. यंत्रमानव उतरलेल्या ठिकाणाला “अगिल्किया‘ हे नाव देण्यात आले आहे. ही प्रक्रिया खूपच किचकट व विमानामधून एखादे वॉशिंग मशीन खाली फेकण्यासारखी होती. एवढ्या मोठ्या उंचीवरून यंत्रमानवाचे तुकडे होण्याची भीती होती व त्याचबरोबर नियोजित जागी त्याला उतरविणे हेही मोठे आव्हान होते. मात्र, या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाल्या आहेत. ही प्रक्रिया पृथ्वीपासून 50 कोटी 90 लाख किलोमीटर उंचीवर घडली,‘‘ असेही संशोधकांनी स्पष्ट केले.

हा यंत्रमानव धूमकेतूवरील खोल खड्डे आणि बर्फाचे डोंगर अशा विचित्र पृष्ठभागाचा अभ्यास करणार असून, सौरमालेच्या जन्मामध्ये धूमकेतूंचा कसा सहभाग होता, हे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

हा धूमकेतू सूर्याभोवती एक फेरी मारण्यास 6.45 वर्षे घेतो व त्याची कक्षा सूर्यापासून कमीत कमी 18 कोटी किलोमीटर, तर अधिकाधिक 84 कोटी किलोमीटर आहे.

“मॉम‘नेही “टिपला‘ धूमकेतू
भारताच्या मंगळयानाने “67 पी‘ या धूमकेतूचे एक महिन्यापूर्वी टिपलेले छायाचित्र “इस्रो‘ने बुधवारी प्रसिद्ध केले. या धूमकेतूचे दर्शन मंगळयानाला 19 ऑक्‍टोबरला झाले होते. त्या वेळी “मॉम‘ने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते, “”बापरे, लक्षात राहण्यासारखा अनुभव. धूमकेतूला अगदी जवळून वेगाने जाताना पाहिले. मी माझ्या कक्षेतच आहे, सुरक्षित आणि सुस्थितीत!‘‘ मंगळयानाच्या कॅमेराने धूमकेतूच्या “कोमा‘ या पृष्ठभागावरील प्रकाशमान भागाचे छायाचित्र काढले आहे.
Rosetta_and_its_target_comet
रोसेटा अंतराळयानाबद्दल…
अंतराळात झेप : 2 मार्च 2004
धूमकेतूच्या कक्षेत प्रवेश : 6 ऑगस्ट 2014
उपकरणे : तीन स्पेक्‍ट्रोस्कोप, एक मायक्रोस्कोप रेडिओ अँटेना आणि एक रडार

“रोसेटा‘च्या मोहिमेची वैशिष्ट्ये
– धूमकेतूच्या मार्गावर यानाने उपग्रहांच्या पट्ट्यामधून मार्गक्रमण केले असून, असा प्रवास करणारे ते पहिले युरोपियन यान.
– सौरऊर्जेचा वापर करीत गुरूच्या कक्षेजवळून गेलेले “रोसेटा‘ हे पहिलेच अंतराळयान.
– धूमकेतूच्या बरोबर त्याच्याच वेगाने प्रवास करणारे हे पहिलेच अंतराळयान असून, धूमकेतूवर सूर्याच्या उष्णतेमुळे काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारे हे पहिले यान ठरणार.
– धूमकेतूवर प्रथमच एखादी वस्तू (यंत्रमानव) उतरविण्यात आला असून, त्याच्या पृष्ठभागावरून प्रथमच छायाचित्रे मिळतील.
– धूमकेतूवरील खनिजांचा त्यावर उतरून केलेला हा पहिलाच अभ्यास ठरेल.
माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम
छायाचित्रे सौजन्य : जालावरुन साभार