२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य

आकाशनिरीक्षकांसाठी एक चमकती भेटवस्तू नभांगणात प्रतीक्षा करीत आहे. तो आहे एक धूमकेतू. नव्यानेच शोधलेला हा धूमकेतू हा चंद्रापेक्षाही जास्त प्रकाशमान आहे असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. 
रशियाच्या खगोलवैज्ञानिकांनी अलीकडेच २०१२ एस १ (आयसॉन) हा धूमकेतू शोधला असून, तो पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे, असे ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या नियतकालिकाने म्हटले आहे. सध्या तो शनि व गुरू यांच्या दरम्यान असून फिकट दिसत आहे, पण जेव्हा तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने जवळ येईल त्या वेळी त्याच्यावरील धूळ व बर्फ निघून जाईल व त्याचा पिसारा अधिक प्रकाशमान दिसू लागेल. हा धूमकेतू मुळातच चमकदार असून, त्याचे सूर्यापासून अंतर कसे बदलत जाते यावर ते अवलंबून आहे असे भारतीय वंशाचे खगोलवैज्ञानिक रामिंदर सिंग सामरा यांनी सांगितले. तीन किलोमीटर रुंदीचा हा धूमकेतू असून २०१३ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये व २०१४च्या सुरुवातीला तो अधिक प्रखर दिसेल. जर हे सगळे खरे ठरले तर तो खगोल इतिहासातील सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरेल असे कॅनडाच्या एच. आर. मॅकमिलन अंतराळ केंद्रात काम करणारे सामरा यांनी ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला सांगितले.
१६९०मध्ये एक महाधूमकेतू दिसला होता. त्याच्याच मार्गाने हा धूमकेतूही येत आहे. तो मंगळापासून १ कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल व तेथील क्युरिऑसिटी या रोव्हरलाही त्याची काही सुंदर छायाचित्रे टिपता येतील. धूमकेतू किती प्रकाशमान दिसेल याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण यापूर्वी असे अंदाज अनेकदा चुकले आहेत असे सामरा यांनी सांगितले.

माहितीचा स्त्रोत : लोकसत्तामधील बातमी

२२ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे आयसॉन हा धूमकेतू ग्रेट ब्रिटन च्या आकाशात कस दिसेल त्याचे हे संकल्प चित्र 

ISON-On-Nov-22-2013before-dawn-from-UK

साधारणपणे १० डिसेंबर २०१३ च्या आसपास  ‘आयसॉन’ या धूमकेतूला आकाशात पाहण्यासाठी पुढील नकाशाचा उपयोग होईल   

ISON10thDec6am

नभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

भाग १: व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

लेखमालेच्या मागच्या भागात आपण पाहिले की तार्‍याची तेजस्विता म्हणजे काय? आणि ही तेजस्विता कोणत्या २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते?

तार्‍यांची तेजस्विता पुढील २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते
१. तार्‍याचे तापमान
आणि
२. तार्‍याचे आकारमान

तर या पहिल्या भागात आकारमान या घटकाच्या अनुषंगाने ज्ञात खगोलविश्वातील आकाराने सर्वात मोठा तारा व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस याचा आढावा आपण घेऊयात.

व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची माहिती घेण्याअगोदर पुढील एक चित्र पाहूयात.
पुढील तुलनात्मक चित्रामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्याला एवढ्या लांब अंतरावरुन घामाच्या धारा आणण्याची क्षमता असलेला आपला हा सूर्य विश्वाच्या पसार्‍यातील एक नगण्य तारा आहे. असे असले तरी पृथ्वीसारख्या ग्रहावर आपणा मानवांची जी उत्क्रांती झालेली आहे त्यामुळे हाच नगण्य असलेला हा सूर्य एक अतिमहत्त्वाचा तारा होतो.
पुढील चित्रात सूर्य, अ‍ॅक्टरस (स्वाती हा तारा) आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍यांची तुलना केलेली आहे.
हे चित्र पाहताना कॄपया हे ध्यानात घ्यावे की यातील स्वाती या तार्‍याचे आकारमान शनी ग्रहाच्या भ्रमणकक्षे एवढे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस च्या पोटात आपण कुठे असू याचा थोडाफार अंदाज बांधता येईल हास्य

या चित्रानंतर थेट सूर्य आणि व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ही तुलना पहा.

अजून एक तुलना:

सूर्य आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस
संपूर्ण आकाराशी तुलना:

कॅनिस मेजॉरिस बद्दल दोन मुख्य विरोधी मते आहेत. एक विचार असा आहे की हा जास्त करुन वायुचा गोळा अधिक आहे ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग प्रत्यक्षात मंगळ ग्रहाच्या कक्षेइतकाच असू शकेल.
पण सर्वमान्य सिद्धांतानुसार व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिसचे आकारमान तेवढेच आहे जेव्हढ्याचा अंदाज केला आहे.
दिलेली चित्रे वाचकांना ‘अबबब’ म्हणायला आणि थोडेफार मंथन करण्यासाठी पुरेशी ठरावीत wink

खुलासा: या लेखात वापरण्यात येणारी अथवा वापरली गेलेली सर्व छायाचित्रे मायाजालावरुन घेण्यात आलेली आहेत. त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यात माफक बदल मी केले आहेत.

आता व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या अवाढव्य तार्‍याची थोडी माहिती पाहूयात.

आपल्या सूर्यापेक्षा जवळपास २,१०० पटींने मोठ्या आकाराचा असा हा लाल रंगाचा राक्षसी तारा आहे.
आपल्यापासून व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ४,९०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजेच या तार्‍याचे जे स्वरुप आज आपण पाहतो आहे ते ४,९०० वर्षांपूर्वीचे पाहतो आहे. आत्ता चालू क्षणी तिथे काय परिस्थिती असेल हे माहिती करुन घेण्याचे कोणतेही तंत्र आपल्याकडे उपलब्ध नाही. लाल रंगाच्या राक्षसी तार्‍याची परिणती सर्वसाधारणपणे सुपरनोव्हा म्हणजे महास्फोटात होते त्यामुळे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस हा तारा आज अस्तित्त्वात असण्याची शक्यता कमीच आहे.

व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस हा बृहल्लुब्धक म्हणून ओळखला जातो. आकाशातील याचे स्थान ओळखायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम लुब्धक (शिकार्‍याचा कुत्रा) या तारकासमूहाची माहिती करुन घ्यावी लागेल. या तारकासमूहातील हा तारा व्ही.वाय. या नावाने ओळखला जातो. या तारकासमूहात अनेक महाकाय तारे आहेत जे आपल्या सूर्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. पण त्या सर्वांत व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस आकाराने मोठा असल्याने भाव खाऊन जातो व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते.

ग्रीक पुराणकथांनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा हा बृहल्लुब्धक (कॅनिस मेजॉरिस) मानला जातो. राजन्य (इंग्रजी नाव रिगेल) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे. दृश्यप्रत म्हणजे तार्‍याची तेजस्विता. दृश्यप्रत कशी मोजतात? तर एखाद्या तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्य प्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्य प्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

पुढील नकाशावरुन आकाशात मृगनक्षत्र शोधता येईल. मृग नक्षत्रातील व्याधाचा तारा म्हणजे नभोमंडलाचे भूषणच आहे. यासारखा दुसरा तेजस्वी तारा आकाशात दिसत नाही. त्यामुळे व्याधाच्या तार्‍याजवळच व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस शोधता येईल. आकाशातील अतितेजस्वी तार्‍याच्या शेजारीच आकाराने सर्वात मोठा असलेला तारा असा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो हे आपले एक भाग्यच म्हटले पाहिजे.

व्याधाच्या (सिरस) तार्‍याभोवती मी गुलाबी रंगाने २ गोल केले आहेत , त्यावरुन कॅनिस मेजॉरिस शोधायला अडचण पडू नये. मृग नक्षत्र जवळपास सर्वांनाच माहिती असते, तरीसुद्धा दिलेल्या नकाशाच्या आकारावरुन व पुढील चित्रावरुन आकाशात हे मृगनक्षत्र ओळखता यावे.

बृहल्लुब्धकाचा हा भाग किती महत्त्वाच्या तार्‍यांनी भरलेला आहे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट होईल.

तर

हबल टेलिस्कोप ने टिपलेले या महाकाय तार्‍याचे  नेत्रसुखद दॄष्य

आणि सर्वात शेवटी व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची आपल्या ग्रहमालेतील महाकाय वाटणार्‍या ग्रहांशी तुलना किती अर्थहीन आहे हे दाखवणारे हे चित्र

तार्‍यांमधील अंतर कसे मोजतात? आणि त्याची रचना कशी ओळखतात?

१.प्रकाश आला तरी तो किती जुना हे कसे ओळखतात?

प्रकाश किती जुना आहे
१ प्रकाशवर्ष = ९४,६०,००,००,००,००० कि.मी.
आता हे कसे काढले?

तर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर मोजायचे झाल्यास ते किलोमीटरमध्ये साधारण ३,८४,००० कि.मी. होते. परंतू त्यापूढील अंतर (तार्‍यांचे) प्रचंड मोठे असल्याने ती किलोमीटरमध्ये मोजणे अशक्य होते. म्हणजे मोजले तरी ते आकलनाच्या दृष्टीने फारसे उपयोगी नसते. जसे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर साधारण १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते. अशी मोठी अंतरे किलोमीटरमध्ये मोजणे शक्य नसल्याने आणि गणनेच्या दृष्टीकोनातून गैरसोयीचे असल्यामुळे त्यासाठी ‘खगोलीय एकक’ (Astronomical Unit – A.U.) ही पद्धती वापरतात. खगोलीय अंतरे मोजण्याची एकके या लेखात अधिक माहिती मिळेलच. पण इथे अजून स्पष्ट करुन सांगतो.

एका सेकंदामध्ये प्रकाश २,९९,७९२.४५८ कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका मिनिटामध्ये प्रकाश १,७९,८७,५४७.४८ कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका तासामध्ये प्रकाश १,०७,९२,५२,८४८.८ कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका दिवसामध्ये प्रकाश २५,९०,२०,६८,३७१.२ कि.मी. इतके अंतर पार करतो.
या वेगाने प्रकाश
एका वर्षामध्ये प्रकाश ९४,६०,००,००,००,००० कि.मी. इतके अंतर पार करतो.

आणि मुख्य म्हणजे प्रकाशाचा वेग हा सर्वत्र सारखा असतो. म्हणून हेच प्रमाण मानून लांब पल्ल्याची अंतरे मोजणे अधिक सोपे पडते. आता उदाहरणार्थ
पृथ्वी ते चंद्र हे अंतर ३,८५,००० किलोमीटर आहे. प्रकाशाच्या वेगाच्या गणितानुसार हे अंतर प्रकाश फक्त १.३ सेकंदात पार करतो.
तसेच सूर्य ते पृथ्वी हे अंतर १४९, ५९७, ८९० कि. मी. आहे. हे अंतर कापण्यास प्रकाश ८.६ मिनिटे एवढा वेळ घेतो.
तार्‍यांची अंतरे किलोमीटरमधे मोजण्यापेक्षा एका वर्षात प्रकाश जे अंतर कापतो तेवढे अंतर प्रकाशवर्ष म्हणून वापरणे सोयीचे पडते. यानुसार,
पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा अल्फा सेंटारी हा पृथ्वीपासून सव्वा-चार प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

आकाशगंगेचा व्यास १,००,००० प्रकाशवर्षे आहे. तर आपल्या सर्वात जवळची आकाशगंगा २२,००,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
या अवाढव्य अंतराच्या गणनेवरुन प्रकाशवर्ष या एककाचे महत्त्व लक्षात यावे.

आपण रात्री जे तारे पाहतो त्यातील एखादा तारा आपल्या पासून १०० प्रकाशवर्ष दूर आहे म्हणजेच त्याच्यापासून निघालेला प्रकाश १०० वर्षे प्रवास केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतो. समजा जर त्या तार्‍याचा स्फोट झाला. तर आपणास तो स्फोट १०० वर्षांनी पाहायला मिळेल. याचाच अर्थ आपण जे तारे पाहतो ते तारे भूतकाळातील असतात.

२.हे तारे अनेक प्रकाशवर्ष दुर असुनही त्यांचे आकारमान, भ्रमणगती, ई.चा अंदाज कसा काढतात?

याच्या अनेक विविध पद्धती आहेत. पॅरालाक्स (Parallax) ही पद्धत मुख्यत्वे करुन वापरली जाते. पण ही पद्धत तारे काही हजार प्रकाषवर्षे अंतरावर असतील तरच वापरली जाते. त्याच्या पलिकडील तार्‍यांबद्दल माहिती गोळा करताना दुसर्‍या पद्धतींचा वापर केला जातो.
तर पॅरालाक्स या पद्धतीत (मराठीत हिला लंबन म्हणतात)
दोन भिन्न बिंदूंपासून एकच वस्तू पाहताना जो कोणीय बदल दिसतो त्याला लंबन अथवा पॅरालाक्स म्हणतात. पुढील चित्रावरुन हे स्पष्ट व्हावे.

या चित्रावरुन आपल्याला ध्यानात येईल की दोन भिन्न बिंदूंतून घेतलेल्या एकाच वस्तूतील कोणीय बदल व त्याच्या मागे निर्माण झालेली पार्श्वभूमी याचा आधार घेतला जातो.

जवळची आणि लांबची वस्तू यांचे अंतर जाणवण्याचे साधे गणित पुढील चित्रावरुन स्पष्ट होईल.

पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरत असते त्यामुळे एकदा नोंदी घेतल्या की पुन्हा सहा महिन्यांनी या नोंदी पुन्हा घेतल्या जातात त्यानंतरच कोणीय बदल ध्यानात येतो. पुढील छायाचित्र ही गोष्ट स्पष्ट करु शकेल.

या व्यतिरिक्त त्या तार्‍याची स्पंदनक्षमता, स्पंदनाचा दर, त्याची तेजस्विता, वर्णपट, रेडिओ लहरी, इत्यादी गोष्टी देखील तार्‍यांचे अंतर आणि त्याचा आढावा घेण्यासाठी वापरतात. खगोलशास्त्र ही एक मोठी शाखा असली तरी त्याच्या अनेक उपशाखाही आहेत ज्यांमध्ये या गोष्टींचा जास्त सखोल अभ्यास होतो

तारे आणि आकाशगंगा

पहिला प्रश्न :

तारा कसा तयार होतो?  व कोणते घटक तार्‍याच्या निर्मितीत भूमिका बजावतात ?

तारे आणि आकाशगंगा:

तार्‍यांमध्ये मुख्य प्रक्रिया असते ती ज्वलनाची आणि या ज्वलनासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचे काम करतात ते हेलियम आणि हायड्रोजन हे वायू. तरीपण तार्‍याला स्वतःचा असा एक द्रवस्वरुप गाभा असतोच. तारा म्हणजे थोडक्यात अंतराळात जळत राहणारी एक भट्टीच असते. अंतराळात प्रचंड शीत तापमान असते. हे तापमान तार्‍यावर परिणाम करतच असते त्यामुळेच प्रतिक्रिया तत्त्वानुसार तार्‍यांमध्ये ही ज्वलनप्रक्रिया सतत चालूच असते. जेव्हा हा इंधनाचा साठा संपत येतो तसतसे तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते आणि परिणामी तो फुगत जातो. आणि शेवटी राक्षसी तार्‍यात परिवर्तित होतो. याच्याही पुढची पायरी म्हणजे राक्षसी तार्‍याचे स्फोटात रुपांतर होते (सुपरनोव्हा). उत्पत्ती स्थिती आणि लय हा विश्वाचा नियम म्हटले तरी चालेल. त्यामुळेच आपल्याला एकाच वेळी विश्वात वेगवेगळ्या ठिकाणी ही सर्व उदाहरणे दिसतात.

तार्‍यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि मुख्यतः हायड्रोजन वायू यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. क्रॅब अभ्रिका (क्रॅब नेब्युला) हे याचेच एक उदाहरण आहे. याबद्दल अधिक माहिती याच समुदायातील नेब्युला या लेखात मिळेल. उर्टचा तेजोमेघ हाही एक तेजोमेघ आहे.  मुळात उर्टचा तेजोमेघ हा पृथ्वीपासून साधारण ५० खगोलीय एकक (जवळपास एक प्रकाशवर्ष ) अंतरावर आहे. एवढ्या जवळ तार्‍यांची निर्मिती झाली तर आपले काही खरे नाही. अर्थात या उर्टच्या मेघाबद्दल शास्त्रज्ञांमध्येच एकमत नसले तरी धूमकेतूंना जन्म देणारा मेघ म्हणून उर्टचा मेघ ओळखला जातो.

त्यानंतर विश्वातले गुरुत्वीय बल या तेजोमेघातील अणूंना आकर्षित करतात व त्यामुळे ते जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. एका विशिष्ट मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. येथेही वैश्विक गुरुत्त्वबल कार्य करते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. येथे प्रत्येक तार्‍याची घनता ठरण्यामागे सुरुवात होते असे म्हटले तर योग्यच राहील. गाभ्याकडे ढासळणार्‍या (खरे तर ओढल्या जाणार्‍या) अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार (उर्जा ही कधीही नष्ट होत नाही तर ती दुसर्‍या रुपात परावर्तित होते) या गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि प्राथमिक अवस्थेतील तार्‍याचा जन्म होतो. अशा तार्‍यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे या प्राथमिक अवस्थेतील तार्‍यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून हे तारे पाहता येतात. (अवरक्त किरण आणि अतिनील किरण यावर लोकसत्ता दैनिकातील या दुव्यावरुन अधिक माहिती मिळेल)

काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठराविक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्‍या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते. व्याधाचा तारा हा अशाच जुळ्यातार्‍यांच्या निर्मितीचे एक उदाहरण आहे.

सिरिअस हा श्वेतवर्णी दिसतो याचे मुख्य कारण व्याध हा द्वित तारा हे आहे. यातील सिरिअस-ब आकाराने सर्वात लहान तारा आहे त्याच्यात प्रचंड घनता आहे, हा श्वेतबटू आहे. व्हाईट ड्वार्फ या नावातच त्याच्या श्वेत रंगाचे उत्तर येते.
ओढून घेण्याची प्रचंड क्षमता असल्यामुळे हा तारा दुसर्‍या मोठ्या तार्‍याला आपल्याभोवती फिरवत असतो. या दुसर्‍या तार्‍याच्या  (सिरिअस-अ) पृष्ठभागाचे तापमान साधारणत: १०,००० डिग्री आहे. यामुळेही या तार्‍याची  चमक वाढते.

मुळात सिरिअस-अ आणि सिरिअस-ब यापैकी सिरिअस-ब हा तारा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. पण हा चिमुरडा सिरिअस-अ ला स्वतःभोवती फिरवतो. सिरिअस-ब चा पृष्ठभाग प्रचंड घनतेमुळे जास्त कठीण आहे. हिर्‍याला आपण कठीण म्हणून ओळखतो. तर सिरिअस-ब चा पृष्ठभाग हिर्‍यापेक्षा ३०० पटींनी जास्त कठीण आहे, यावरुन कल्पना येईल.  तर हे दोन तारे एकमेकांभोवती फिरताना सिरिअस-अ चा वायू व द्रव भाग सिरिअस-ब आपल्याकडे खेचून घेतो त्यामुळे दोघांभोवती प्रचंड मोठे मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. यामुळे बाकीचे रंग यात शोषले जातात असे म्हटले तरी चालेल. पण मुख्यत्वे सिरिअस-ब तार्‍याच्या भूमिकेमुळे आणि मॅग्नेटीक फिल्डमुळे सिरिअस-अ तार्‍याला खूप चकाकी येते. आणि या चकाकीमुळेच हा तारा शुभ्र पांढरा दिसतो.
सिरिअस अ आणि ब एकमेकांसमोर आले की ( पृथ्वीच्या दिशेने) असे दिसतात :

दुसरा प्रश्न :

युनिव्हर्सचा उगम बिग बॅगच्या वेळी (सुमारे 12,000,000,000 वर्ष आधी) झाला अस मानतात, तर हे तारे ईतक्या कमी कालावधीत एक्मेकांपासुन ईतके दुर कसे गेले? थोडक्यात काही वर्षात युनिव्हर्सचा विस्तार काही प्रकाषवर्ष कसा झाला?

मुळात बिग बँग थिअरी हा एक तर्क आहे. विस्फोटातून विश्वाची उत्पत्ती झाली असे मानले तरी त्या सिद्धांतानुसार विश्व प्रसरण पावले पाहिजे. मुळात स्फोट कशाचा झाला? कोठे झाला याचे पुरावे शोधण्याएवढा आवाका मानवाचा असेल असे मला नाही वाटत. विश्वाचा पसारा हा खूप प्रचंड आहे. केवळ बिग-बँग थिअरी मान्य केली तरी विस्फोटाच्या मूलभूत सिद्धांतानुसार स्फोट झाल्यावर सर्व वस्तू विश्वात प्रसरण पावल्या पाहिजे. तसे असेल तर अ‍ॅन्ड्रोमेडा ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेने प्रवास करते आहे आणि काही वर्षांनी (साडेचार बिलियन वर्षांनी) आपल्या आकाशगंगेला धडकणार आहे याचे स्पष्टीकरण विस्फोट सिद्धांतात बसत नाही.
तरीपण हा सिद्धांत खरा मानला तरी विस्फोट हा गती प्रदान करतो आणि ही गती सर्वस्वी स्फोटावर अवलंबून असते. प्रचंड मोठा विस्फोट झालेला असेल तर गती कितीही असू शकते. आणि एवढा काळ अवकाशाच्या तुलनेत लहानच – नगण्यच आहे पण आपल्या गणनेप्रमाणे मोठा आहे.

बाकी ही अ‍ॅन्ड्रोमेडा आकाशगंगा अगदी सुंदर दिसते. ही पहा

राक्षसी तारे : एक तुलनात्मक आढावा

या दुव्यावर ही माहिती उपलब्ध आहे.


या दुव्यातील छायाचित्रे पाहून लक्षात येते की आपले विश्वातील स्थान किती नगण्य आहे ते.पण तरीही आपण एक प्रगत संस्कृती म्हणून महान आहोतच. कारण हे विश्व मापण्याचा प्रयत्न करणारे आपणच एकमेव आहोत 🙂 (किमान आपल्या माहितीत तरी)

राक्षसी तारे  तुलनात्मक छायाचित्रे :


१. आपल्या पृथ्वीच्या तुलनेत प्लुटो व इतर लहान आकाराचे ग्रहः


२. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :


३. आपला सूर्य आणि आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :


४. आपला सूर्य , सिरियस तारा (हा श्वेत बटूसह जोडतारा आहे), पोलॉक्स आणि अ‍ॅक्टरस तारा यांचे तुलनात्मक आकार  :५. सूर्य व अ‍ॅक्टरस या तार्‍यांची बेटेलग्यूज (काक्षी) व अ‍ॅन्टारस या ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या राक्षसी तार्‍यांबरोबर तुलनात्मक दृष्ट्या आकारः