नभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

भाग १: व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

लेखमालेच्या मागच्या भागात आपण पाहिले की तार्‍याची तेजस्विता म्हणजे काय? आणि ही तेजस्विता कोणत्या २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते?

तार्‍यांची तेजस्विता पुढील २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते
१. तार्‍याचे तापमान
आणि
२. तार्‍याचे आकारमान

तर या पहिल्या भागात आकारमान या घटकाच्या अनुषंगाने ज्ञात खगोलविश्वातील आकाराने सर्वात मोठा तारा व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस याचा आढावा आपण घेऊयात.

व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची माहिती घेण्याअगोदर पुढील एक चित्र पाहूयात.
पुढील तुलनात्मक चित्रामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्याला एवढ्या लांब अंतरावरुन घामाच्या धारा आणण्याची क्षमता असलेला आपला हा सूर्य विश्वाच्या पसार्‍यातील एक नगण्य तारा आहे. असे असले तरी पृथ्वीसारख्या ग्रहावर आपणा मानवांची जी उत्क्रांती झालेली आहे त्यामुळे हाच नगण्य असलेला हा सूर्य एक अतिमहत्त्वाचा तारा होतो.
पुढील चित्रात सूर्य, अ‍ॅक्टरस (स्वाती हा तारा) आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍यांची तुलना केलेली आहे.
हे चित्र पाहताना कॄपया हे ध्यानात घ्यावे की यातील स्वाती या तार्‍याचे आकारमान शनी ग्रहाच्या भ्रमणकक्षे एवढे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस च्या पोटात आपण कुठे असू याचा थोडाफार अंदाज बांधता येईल हास्य

या चित्रानंतर थेट सूर्य आणि व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ही तुलना पहा.

अजून एक तुलना:

सूर्य आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस
संपूर्ण आकाराशी तुलना:

कॅनिस मेजॉरिस बद्दल दोन मुख्य विरोधी मते आहेत. एक विचार असा आहे की हा जास्त करुन वायुचा गोळा अधिक आहे ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग प्रत्यक्षात मंगळ ग्रहाच्या कक्षेइतकाच असू शकेल.
पण सर्वमान्य सिद्धांतानुसार व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिसचे आकारमान तेवढेच आहे जेव्हढ्याचा अंदाज केला आहे.
दिलेली चित्रे वाचकांना ‘अबबब’ म्हणायला आणि थोडेफार मंथन करण्यासाठी पुरेशी ठरावीत wink

खुलासा: या लेखात वापरण्यात येणारी अथवा वापरली गेलेली सर्व छायाचित्रे मायाजालावरुन घेण्यात आलेली आहेत. त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यात माफक बदल मी केले आहेत.

आता व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या अवाढव्य तार्‍याची थोडी माहिती पाहूयात.

आपल्या सूर्यापेक्षा जवळपास २,१०० पटींने मोठ्या आकाराचा असा हा लाल रंगाचा राक्षसी तारा आहे.
आपल्यापासून व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ४,९०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजेच या तार्‍याचे जे स्वरुप आज आपण पाहतो आहे ते ४,९०० वर्षांपूर्वीचे पाहतो आहे. आत्ता चालू क्षणी तिथे काय परिस्थिती असेल हे माहिती करुन घेण्याचे कोणतेही तंत्र आपल्याकडे उपलब्ध नाही. लाल रंगाच्या राक्षसी तार्‍याची परिणती सर्वसाधारणपणे सुपरनोव्हा म्हणजे महास्फोटात होते त्यामुळे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस हा तारा आज अस्तित्त्वात असण्याची शक्यता कमीच आहे.

व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस हा बृहल्लुब्धक म्हणून ओळखला जातो. आकाशातील याचे स्थान ओळखायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम लुब्धक (शिकार्‍याचा कुत्रा) या तारकासमूहाची माहिती करुन घ्यावी लागेल. या तारकासमूहातील हा तारा व्ही.वाय. या नावाने ओळखला जातो. या तारकासमूहात अनेक महाकाय तारे आहेत जे आपल्या सूर्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. पण त्या सर्वांत व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस आकाराने मोठा असल्याने भाव खाऊन जातो व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते.

ग्रीक पुराणकथांनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा हा बृहल्लुब्धक (कॅनिस मेजॉरिस) मानला जातो. राजन्य (इंग्रजी नाव रिगेल) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे. दृश्यप्रत म्हणजे तार्‍याची तेजस्विता. दृश्यप्रत कशी मोजतात? तर एखाद्या तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्य प्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्य प्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

पुढील नकाशावरुन आकाशात मृगनक्षत्र शोधता येईल. मृग नक्षत्रातील व्याधाचा तारा म्हणजे नभोमंडलाचे भूषणच आहे. यासारखा दुसरा तेजस्वी तारा आकाशात दिसत नाही. त्यामुळे व्याधाच्या तार्‍याजवळच व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस शोधता येईल. आकाशातील अतितेजस्वी तार्‍याच्या शेजारीच आकाराने सर्वात मोठा असलेला तारा असा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो हे आपले एक भाग्यच म्हटले पाहिजे.

व्याधाच्या (सिरस) तार्‍याभोवती मी गुलाबी रंगाने २ गोल केले आहेत , त्यावरुन कॅनिस मेजॉरिस शोधायला अडचण पडू नये. मृग नक्षत्र जवळपास सर्वांनाच माहिती असते, तरीसुद्धा दिलेल्या नकाशाच्या आकारावरुन व पुढील चित्रावरुन आकाशात हे मृगनक्षत्र ओळखता यावे.

बृहल्लुब्धकाचा हा भाग किती महत्त्वाच्या तार्‍यांनी भरलेला आहे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट होईल.

तर

हबल टेलिस्कोप ने टिपलेले या महाकाय तार्‍याचे  नेत्रसुखद दॄष्य

आणि सर्वात शेवटी व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची आपल्या ग्रहमालेतील महाकाय वाटणार्‍या ग्रहांशी तुलना किती अर्थहीन आहे हे दाखवणारे हे चित्र

खगोलीय घटना : पिन-व्हील आकाशगंगेत झालाय सुपरनोव्हाचा विस्फोट

एम-१०१ उर्फ पिन-व्हील या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर्पिलाकार आकाशगंगेत गेल्या महिन्यात म्हणजे २३ ऑगस्ट २०११ या दिवशी एक खूप मोठा सुपरनोव्हाचा विस्फोट झाल्याचा शोध लागला.
हीच ती पिन-व्हील आकाशगंगा :

From Khagol

आज संध्याकाळपासून म्हणजे १४ सप्टेंबर २०११ पासून या सुपरनोव्हाची चमक ही सर्वात जास्त राहीन. किमान पुढील एक महिना तरी हे विहंगम दृष्य आकाशात एका छोट्याश्या दुर्बिणीच्या साहाय्याने पाहता येईल.

ध्रुव तार्‍याकडे दिशानिर्देश करणार्‍या सप्तर्षि तारकासमूहाच्या शेवटच्या तीन तार्‍यांच्या खालच्या बाजूला या सुपरनोव्हाचे दर्शन घडेल.
पुढील २ नकाशांवरुन सुपरनोव्हाचे ठिकाण आकाशात सहज शोधता येईल.
नकाशा क्र. १:

From Khagol

नकाशा क्र. २

From Khagol

आणि या नकाशावरुन पिन-व्हील आकाशगंगेतील सुपरनोव्हाची नक्की जागा कळू शकेल.

या अत्भुत खगोलीय घटनेची अजून माहिती घेण्याअगोदर आपण “सुपरनोव्हा म्हणजे काय? ” हे थोडक्यात पाहूयात.
सुपरनोव्हाची गळाभेट घेण्या अगोदर आधी ‘नोव्हा’च्या दारात थोडी पायधूळ झाडूयात.
नोव्हा बहुतांशी दोन तार्‍यांच्या धुमश्चक्रीतून निर्माण होतो. जेव्हा एखादा श्वेत बटू तारा (ज्याची घनता जास्त असते) त्याच्या जवळ असणार्‍या (आयुष्य संपत आलेल्या) राक्षसी तार्‍यातील द्रव्य (हेलियम वायू) मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचून घेतो त्यावेळी हेलियम आणि हायड्रोजन या दोन वायुंच्या संयोगामुळे प्रचंड मोठे स्फोट होतात, या विस्फोटांमुळे तार्‍याची तेजस्विता कितेक पटींने वाढते व हे स्फोट दुर्बिणीतून आपल्याला दिसतात. अर्थात यांचे प्रमाण मर्यादीत असते म्हणून या स्फोटाला नोव्हा म्हणतात

आता सुपरनोव्हाकडे वळूयात.
आकाशातील एखाद्या विशाल ताऱ्याचा स्फोट होतो आणि तो प्रज्वलित होऊन आकाशात बराच काळ दिसतो , ताऱ्यांच्या या स्थितीला सुपरनोव्हा असे म्हणतात . आपल्या मिल्की वे या आकाशगंगेतील केपलर सुपरनोव्हाचा स्फोट सुप्रसिद्ध आहे. पुढील छायाचित्रावरुन या केपलर सुपरनोव्हाच्या सौंदर्याची भुरळ पडू लागली तरी हे विहंगम दिसत असलेले दृश्य एका महाविस्फोटाचे आहे हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.

आता आजपासून एक महिनाभर अवकाशात दिसणार्‍या या अत्भुत खगोलीय घटनेची माहिती घेऊयात.
पिन-व्हील (एम-१०१) या आकाशगंगेत झालेल्या या विस्फोटाची पहिली माहिती २३ ऑगस्ट २०११ लाच मिळाली होती. हळू हळू या सुपरनोव्हाची चमक वाढते आहे आणि आज रात्री किंवा उद्या (गुरुवारी) रात्री याची चमक उच्चतम असेल. साधारण महिनाभर आकाशात हे रोमांचक दृश्य पहावयास मिळेल. त्यानंतर मात्र ही चमक हळू हळू कमी होईल. वैज्ञानिकांना या सुपरनोव्हाच्या स्फोटाचे अगदी सुरुवातीचे काही क्षण पहावयास मिळाले आहेत, आणि ही अतिशय दुर्मिळ स्थिती असते. बर्‍याच वेळा स्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी या घटनांचा शोध लागतो. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात जवळ असलेला आणि सर्वात चमकदार असा सुपरनोव्हाचा विस्फोट आहे. या सुपरनोव्हाचे नामकरण “एस.एन.२०११-एफ.ई.” असे ठेवण्यात आले आहे. आपल्यापासून साधारणपणे २.१ कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या या सर्पिलाकार आकाशगंगेचे अंतर इतर आकाशगंगांच्या तुलनेने जवळ आहे.

आतापर्यंत संपूर्ण मानवजातीच्या ज्ञात इतिहासात केवळ ४ सुपरनोव्हाचे स्फोट झाल्याची माहिती आहे, यावरुन ह्या खगोलीय घटनेचे महत्त्व लक्षात यावे. हे सर्व चारही स्फोट आपल्याच आकाशगंगेत झालेले होते.

पहिला स्फोट १००६ साली,
दुसरा १०५४ साली,
तिसरा १५७२ साली आणि
चौथा १६०४ साली
असे सर्वात चमकदार चार सुपरनोव्हाचे स्फोट ज्ञात आहेत.

कोणत्याही प्लॅनेटोरियममध्ये जाऊन हे सुंदर दृश्य तुम्हाला बघता येईल. पुढील महिनाभरच दिसणारे हे सुंदर दृश्य कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्यात बघावयास मिळण्याची शक्यताही नाहीये. तेव्हा ही संधी चुकवू नका आणि या अत्भुत खगोलीय घटनेचा – सुपरनोव्हाचा स्फोट – अवश्य पहा.

खुलासा: या लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे वा रेखाचित्रे मायाजालावरुन घेतलेली आहेत, त्यात जरुरीप्रमाणे थोडे फार बदल वाचकांना सहज कळावे यासाठी मी केले आहेत.

राक्षसी तार्‍यांचे आकार

माहितीचा स्त्रोत : http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/cc/Star-sizes.jpg

राक्षसी तार्‍यांचे आकार :

पुढील छायाचित्रे आपल्याला तार्‍यांचे आकार स्पष्ट करुन सांगतील. यावरुन असे दिसून येते की ज्याप्रमाणे दिवा विझण्यापूर्वी जशी ज्योत मोठी होते त्याप्रमाणेच तार्‍याचे आयुष्य संपत आले की तो फुगत जातो.

व्ही वाय कॅनिस मेजॉरिस हा तारा जरी अ‍ॅन्टारस या तार्‍यापेक्षा मोठा असला तरी बेटेलग्यूज, अ‍ॅन्टारस आणि हा तारा यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की सूर्य आणि अ‍ॅन्टारस या तार्‍यांत जशी प्रकर्षाने जाणवणारी तफावत या तीन तार्‍यांच्या तुलनेत नाही जाणवत.
(VY Canis Majoris) व्ही वाय कॅनिस मेजरिस हा ज्ञात खगोलविश्वातला आकाराने सर्वात मोठा तारा आहे. हा पृथ्वीपासून ४,९०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
सूर्यापेक्षा हा तारा ३४६५ पटींने मोठा आहे

यावरुन असा ढोबळ निष्कर्ष काढता येतो की तार्‍याच्या आकारमानावर काही मर्यादा असावी. तार्‍याचे आयुष्य संपत आले की तो फुगत जातो आणि त्यानंतर त्याची वाटचाल महास्फोटा (सुपरनोव्हा) च्या दिशेने सुरु होते.

तार्‍यांचे आकार
तार्‍यांचे आकार

राक्षसी तारे : एक तुलनात्मक आढावा

या दुव्यावर ही माहिती उपलब्ध आहे.


या दुव्यातील छायाचित्रे पाहून लक्षात येते की आपले विश्वातील स्थान किती नगण्य आहे ते.पण तरीही आपण एक प्रगत संस्कृती म्हणून महान आहोतच. कारण हे विश्व मापण्याचा प्रयत्न करणारे आपणच एकमेव आहोत 🙂 (किमान आपल्या माहितीत तरी)

राक्षसी तारे  तुलनात्मक छायाचित्रे :


१. आपल्या पृथ्वीच्या तुलनेत प्लुटो व इतर लहान आकाराचे ग्रहः


२. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :


३. आपला सूर्य आणि आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :


४. आपला सूर्य , सिरियस तारा (हा श्वेत बटूसह जोडतारा आहे), पोलॉक्स आणि अ‍ॅक्टरस तारा यांचे तुलनात्मक आकार  :५. सूर्य व अ‍ॅक्टरस या तार्‍यांची बेटेलग्यूज (काक्षी) व अ‍ॅन्टारस या ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या राक्षसी तार्‍यांबरोबर तुलनात्मक दृष्ट्या आकारः


राक्षसी तारे : तोंडओळख

राक्षसी तारे : तोंडओळख

राक्षसी तारे हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे.

काही राक्षसी तारे:

वरील यादीत असलेल्या बेटेल्गेयुझ (Betelgeuze) या तार्‍याचे लोकेशन माहिती नसेल तर सांगतो

आकाशात मृग नक्षत्र माहिती असेलच. नसेल तर किमान व्याधाचा तारा तरी माहिती असेल.

या बेटेलग्यूज तार्‍याला मराठीत काक्षी म्हणून ओळखले जाते.

तर मृग नक्षत्रात दिसणारा सर्वात तांबूस रंगाचा तारा म्हणजेच हा बेटेलग्यूज (काक्षी)

वाचकांनी जर लक्ष दिले तर मुख्यत्वेकरुन सर्व मोठ्या आकाराचे तारे हे तांबड्या रंगाचे आहे हे लक्षात येते.

तर आकारमानाने मोठे तारे दिसतात हे सर्व इंग्रजीत RED GIANT STARS (लाल राक्षसी तारे) म्हणून ओळखले जातात.

तारे लाल आणि राक्षसी का होतात? हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. मला राक्षसी तारे ही लेखमाला कित्येक वर्षांपासून लिहायची आहे. पण अभ्यासास वेळ नसल्यामुळे तूर्तास थोडक्यात सांगतो.

तारे म्हणजे एक प्रकारची उर्जा निर्माण करणारी भट्टीच असते. प्रचंड प्रमाणावर हेलियम व हायड्रोजन यांच्या नियमित आणि सततच्या प्रक्रियेतून तार्‍याचे प्रज्वलन चालू असते. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत चालू असते तोपर्यंत तार्‍याचे सर्व अवयव एकत्र घट्टपणे दाबून ठेवले जातात. म्हणजेच दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की तार्‍यांतील इंधन मुबलक प्रमाणात असते.

ज्यावेळी तार्‍यामधील हे इंधन संपू लागते तेव्हा त्या तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते व परिणामी तो अवाढव्यपणे फुगत जातो. थोडक्यात हे तारे राक्षसी आकाराचे होतात. याच राक्षसी तार्‍यांचे रुपांतर पुढे महाकाय स्फोटात, म्हणजेच सुपरनोव्हात होते.

‘आदित्य’ ह्या नावाचा तारा ज्ञात खगोलविश्वात सर्वात मोठ्या आकाराचा आहे. आदित्य हा तारा आपल्यापासून १०९ प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि सूर्यापेक्षा २०,००० पटींनी मोठा आहे

दक्षिण आकाशात क्षितिजाच्या वर साधारण ३० ते ५० अंश वर दिसतो हा तारा. हा तारा आपल्यापासून हजारो प्रकाशवर्ष अंतरावर असल्यामुळे आपण कदाचित वाचलो असे म्हणता येईल. कारण हा तारा स्फोट पावणार आहे ( गणिताप्रमाणे याचा स्फोट होण्यास अजून अवकाश आहे, पण प्रत्यक्षात स्फोट झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण आपण जो प्रकाश पाहतो आहोत तो १०९ वर्षांपूर्वीचा वर्षांपूर्वीचा असतो हास्य)